मुंबई – इंदोरमध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा अभिनेत्री शबाना आझमी, हेमामालिनी आणि ऋषी कपूर यांनी निषेध केला आहे. बुधवारी आरोग्य विभागाची पाच वैद्यकीय कर्मचाऱ्यांची टीम तत्पत्ती बखाल भागात एका करोनाग्रस्ताशी संबंधीत नातेवाईकांना क्वारंटाईन करण्यासाठी गेली होती त्यावेळी त्या नातेवाईकांनी आणि आसपासच्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा प्रकार घडला होता.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या डॉ तृप्ती आणि डॉ रझिया यांना उद्देशून लिहिलेल्या संदेशात अभिनेत्री शबाना आझमी यांनी म्हटले आहे की, तुम्ही लोकांपुढे समाज कार्याचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ज्यांनी तुमच्यावर दगडफेक केली ते निंदनीय आणि लाजिरवाणे आहे त्याचा निषेधच व्हायला हवा.
अभिनेत्री हेमामालिनी यांनी म्हटले आहे की, एकीकडे संपुर्ण देश डॉक्टर्स व वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत असताना, इंदोरमध्ये समाजकंटकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. जे लोक आपले प्राण वाचवण्यासाठी येत आहेत त्यांच्यावर हे हल्ले होतातच कसे असा सवालही त्यांनी केला आहे. हे घृणास्पद आहे अशा शब्दात हेमामालिनी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. पोलिस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कोणीही असा प्रकार करू नये ूअसे आवाहन अभिनेते ऋषी कपूर यांनी केले आहे.