शबाना आझमींची मद्य विक्रेत्याकडून फसवणूक; ऑनलाईन पैसे भरूनही डिलिव्हरी मिळालीच नाही

मुंबई – करोना संकटाच्या काळात अनेक लोक घराबाहेर पडण्यापेक्षा ऑनलाईन पद्धतीचा वापर करून आपल्याला हव्या असलेल्या वस्तू ऑर्डर करीत आहेत. सकाळच्या नाश्त्यापासून ते महिनाभराच्या किराण्यापर्यंत असं सर्व काही आता ऑनलाईन मिळू लागल्याने घराबाहेर पडण्याची गरज कमी झाली आहे.

मात्र ऑनलाईन खरेदी करत असताना योग्य काळजी न घेतल्यास आपली फसवणूक देखील होऊ शकते. याचाच प्रत्यय सध्या ज्येष्ठ अभिनेत्या शबाना आझमी यांना आलाय.

याबाबतची माहिती स्वतः शबाना आझमी यांनी ट्विट करत दिली आहे. याबाबत आझमी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी ‘लिव्हिंग लिक्विड’ या ऑनलाईन मद्य विक्री करणाऱ्या संकेतस्थळावरून ऑनलाईन मद्य मागवले होते. याचे बिल देखील त्यांनी ऑनलाईन भरले होते. मात्र यानंतर ही ऑर्डर त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही.

‘याबाबत आपण ‘लिव्हिंग लिक्विड’शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपले फोन उचलणे देखील बंद केलं’ अशी कैफियत आझमी यांनी मांडली आहे. ट्विटद्वारे आझमी यांनी, आपण कोणत्या खात्यावर पैसे पाठवले याबाबतची माहिती देखील दिली असून इतरांना ऑर्डर करताना सावधानता बाळगा असा सल्ला दिलाय.

आझमी यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘लिव्हिंग लिक्विड’ला किती पैसे ट्रान्सफर केले याबाबतचा तपशील मात्र दिलेला नाहीये.

दरम्यान, शबाना आझमी यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना, ऑनलाईन मद्य मागवल्यानंतर आपल्या सोबतही अशाच प्रकारची फसवणूक झाली असल्याचं म्हटलंय. तर काहींनी याबाबत पोलिसांत तक्रार करा असा सल्ला आझमी यांना दिलाय.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.