जुन्नर- करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी कायदा लागू असून मुस्लिम बांधवांनी ‘शब-ए-बारात’चा सण घरीच साजरा करावा, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी दीपाली खन्ना यांनी केले आहे. यानिमित्ताने नमाजपठणासाठी धार्मिक स्थळी जमू नये तसेच प्रत्येकाने आपापल्या घरी राहून नमाज, कुराण पठण करावे व घरातल्या घरात हा सण साजरा करावा, असे त्यांनी सांगितले.
शाबान महिन्यातील १५ व्या तारखेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणाच्या दिवशी मुस्लिम बांधव आपल्या हातून घडलेल्या चुकीच्या गोष्टींची माफी अल्लाकडे मागत असतात. याप्रसंगी विशेष नमाज पडून येत्या वर्षासाठी दुवाही मागितली जाते.
सर्व धार्मिक उत्सवांवर पोलिसांची करडी गस्त राहणार असून संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी याप्रसंगी दिला. तसेच सोशल मीडियावर धार्मिक तेढ वाढविणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जुन्नर शहर व परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली असून वाहन जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.