मालेगावमधील मदरशात मुलीवर लैंगिक अत्याचार; व्यवस्थापकासह तिघांना अटक

मालेगाव – मालेगाव शहरातील दरेगाव शिवारातील मदरशात दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मदरशाच्या व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे. या घटनेमुळे मालेगाव शहरात खळबळ उडाली आहे.

पीडिता मुंबईच्या मालाड येथील एका गरीब कुटुंबातील मुलगी आहे. पीडित मुलीच्या आईला मालेगावातील एका महिलेने तिला मालेगावमधील मदरशात शिक्षणासाठी पाठविण्याचा सल्ला दिला होता. यानंतर पाच महिन्यापूर्वी पीडित मुलगी मदरशात धार्मिक शिक्षणासाठी दाखल झाली होती.

दरम्यान, घराच्या स्वच्छतेच्या कामासाठी या मुलीला बोलवून तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. ही घटना घडल्यानंतर पीडित मुलीने बाहेर पडत थेट पोलीस स्टेशन गाठत झालेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्या मुलीला नाशिक येथील बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

या प्रकाराची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी मदरशातील मुख्य व्यवस्थापकासह त्याची पत्नी, एक महिला कर्मचारी आणि एका मुलाला ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना न्यायालयात दाखल केले असता त्यांना पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.