अकोला – अकोल्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सैनिक भरतीचे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीवर प्रशिक्षकानेच सलग चार वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अमित जाधव असे आरोपी प्रशिक्षकाचे नाव आहे. पीडित तरुणीने गुरुवारी रात्री उशीरा अकोल्यातील रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रामदास पेठ पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित 22 वर्षीय तरुणी ही शेगाव येथील रहिवासी आहे. ती सैनिक भरती प्रशिक्षणासाठी चार वर्षापासून अकोला येथे राहत आहे. शहरातील वसंत देसाई स्टेडियमवर पोलीस आणि सैनिक भरतीच प्रशिक्षण घेण्यासाठी तरुणी जात होती. दरम्यान अमितशी तरुणीचा ओळख झाली व या दोघांत मैत्री झाली. त्यानंतर अमितने प्रेम करत असल्याची बतावणी करत पीडित तरुणीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले.
तरुणीवर हे अत्याचार विविध ठिकाणी नेत मागिल चार वर्षापासून केले गेले. नंतर आपली फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. रामदार पेठ पोलिसांनी प्रशिक्षक अमित जाधव यास अटक करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.