पुणे – सेक्सटॉर्शन ट्रॅपच्या माध्यमातून एका व्यक्तीला जाळ्यात खेचल्यानंतर रेकॉर्डींग केलेले अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याच्या बहाण्याने 5 लाख 54 हजाराची खंडणी उकळल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी धानोरी येथील एका 35 वर्षीय व्यक्तीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार झिनत शर्मा नावाच्या फेसबुकधारक महिलेवर आयटी अॅक्टनुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 29 मे रोजी घडली आहे. सेक्सटॉर्शन टोळीकडून सतत होणार्या मागणीला कंटाळल्यानंतर संबंधीत व्यक्तीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींची फेसबुकच्या माध्यमातून झिनत शर्मा नावाच्या तरुणीसोबत ओळख झाली. त्यानंतर शर्मा हिने फिर्यादींना आपल्या जाळ्यात खेचून व्हिडीओ कॉलवर अश्लिल वर्तन करण्यास भाग पाडले. हा सर्व प्रकार सुरू असताना तिने फिर्यादींचा व तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यानंतर रेकॉर्ड केलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादींकडे पैशाची मागणी केली.
सुरूवातीला घाबरलेल्या फिर्यादींनी बदनामीच्या भितीपोटी आरोपींच्या वेगवेगळ्या बँक खात्यावर 5 लाख 54 हजार रुपये पाठवले. मात्र त्यानंतर देखील आरोपींचा फिर्यादींकडे पैशाचा तगादा सुरूच होता. याबाबत फिर्यादींनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यांनंतर चौकशीअंती विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.