भुयारी गटर तुंबून साचले गुडघाभर सांडपाणी

काळाखडक येथील प्रकार ः भूमकर चौकापर्यंत पाणी

चिंचवड – काळाखडक येथे भुयारी गटर तुंबून भूमकर चौकापर्यंत गुडघाभर सांडपाणी साचले आहे. काही दुचाकी चालक त्यात पडून दुखापत होण्याची घटना आज (सोमवारी) घडली. यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

चिंचवड, भोसरी भागातील अनेक दुचाकी, चारचाकी मध्यम अवजड वाहने हिंजवडी आयटी पार्कमध्ये व मुंबईकडे जातात. येथील काळाखडक झोपडपट्टी लगत भुयारी गटर तुंबले. त्यातील पाणी रस्त्यावर आज मोठ्या प्रमाणात वाहून भूमकर चौकातील पुलाखाली गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईकडे ये-जा करणारे, एस. टी. बसमधून येथे उतरणारे प्रवासी व पादचाऱ्यांना पी.एम.पी.एम.एल. बसथांब्यापर्यंत येण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यात सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. शेजारून वाहन जाताना मैलापाणी दुसऱ्यांच्या अंगावर उडून वाद होत आहेत.

सांडपाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वाहन चालक पडून त्यांना दुखापत होण्याचे प्रकार घडले. याबाबत तेथील वाहतूक पोलिसांना विचारले असता वारंवार असे प्रकार घडत असून कायमचा तोडगा काढण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगितले.

येथे एकेरी मार्ग असून सकाळी, संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागतात. त्यात गुडघाभर पाण्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पाणीपुरवठा अभियंता, तसेच आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना कायमस्वरूपी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.