खराडीत नागरिकांना दुर्गंधीयुक्‍त पाणी

नगरसेवकांच्या पाठपुराव्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लंक्ष

वडगावशेरी – खराडी येथील संघर्ष चौक व अष्टविनायक सोसायटीमध्ये गेल्या काही महिन्यापासून ड्रेनेजचे पाणी जलवाहिनीमध्ये मिसळले गेल्याने नागरिकांना दुर्गंधीयुक्त व आरोग्यघातक पाणी येत होते. नगरसेवकांच्या सतत पाठपुरावा करून देखील अधिकाऱ्याकडून मात्र दुर्लक्ष केले जात होते. अनेक वेळा लेखी तक्रारी करून देखील त्याकडे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करतात असा आरोप नगरसेवक महेंद्र पठारे ह्यांनी केला. अखेर पाहणी करण्यासाठी अधिकारी आल्यावर मात्र नगरसेवक व स्थानिक नागरिकांनी अधिकाऱ्यांचा घाम काढला, त्यावेळी अधिकाऱ्यांनी मुक्‍याची भूमिका घेत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला मात्र आक्रमक नागरिक व नगरसेवकामूळे अखेर अधिकाऱ्यांना काम करावेच लागेल.

या भागात छोटे ड्रेनेज पाइप आहेत. त्यामुळे ते सतत तुंबतात. त्यातून जीर्ण झालेल्या किंवा लिकेज आलेल्या जलवाहिनी मध्ये ड्रेनेजचे दूषित पाणी एकत्रित होऊन तेच पाणी नागरिकांना जलवाहिनी मार्फत येते. त्यामुळे नगरसेवकांनी ते ड्रेनेज स्वच्छ करून ज्या ठिकाणी जलवाहिनी लिकेज आहे, त्याठिकाणी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. मात्र नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर ड्रेनेज स्वच्छ करण्यात आले. मात्र, समस्या अजूनही आहे. त्यामुळे ही समस्या मुळा सहित नष्ट करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

यावेळी नगरसेवक महेंद्र पठारे, पाणीपुरवठा अधिकारी एकनाथ गाडेकर, क्षेत्रीय अधिकारी राजेश बनकर, नितीन जाधव, नीलम गायकवाड, अभियंता परशुराम चोपडे व महादेव बोबडे व स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी क्षेत्रीय अधिकारी राजेश बनकर म्हणाले की त्रिमूर्ती मित्र मंडळ येथे दूषित पाणी येते या संदर्भात तक्रार आली होती. आम्ही पाहणी केली तेव्हा वैयक्तिक नळजोडणी केली असलेल्या नागरिकांच्या नळातून दूषित पाणी येते असल्याचे आढळून आले. त्यामुळे आम्ही ड्रेनेजची साफसफाई करून घेतली आहे. आता नळजोडणी कुठे लिकेज आहे का किंवा जलवाहिनी कुठे गळती आहे, याची तपासणी गुरुवारी करता आली नाही ती आता शुक्रवारी करण्यात येणार आहे.

या परिसरात पाहणी केली तेव्हा ड्रेनेज तुंबले होते त्यामुळे पाणी मुरते ते पाणी लिकेज जलवाहिनीमध्ये गेल्यामुळे हा प्रकार घडला. गुरुवारी पाणीपुरवठा बंद असल्यामुळे समस्या समजणार नाही. पाणी आल्यावर पुन्हा एकदा पाहणी करून काय दोष आहे, तो निवारण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
– एकनाथ गाडेकर, उपअभियंता पाणीपुरवठा


अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे माझ्या भागातील नागरिकांना दररोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याकडून तक्रारी येत असल्यामुळे मी अधिकाऱ्याकडे सतत पाठपुरवठा केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कामचुकार अधिकाऱ्यांची तक्रार आयुक्‍तांकडे करणार आहे.
– महेंद्र पठारे, नगरसेवक

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.