दापोडी परिसरात सांडपाणी वाहतेय रस्त्यावरून

ड्रेनेज तुंबल्याने आरोग्य धोक्‍यात : निवडणुकीच्या धामधुमीत महापालिकेचे दुर्लक्ष

पिंपळे गुरव – गेल्या अनेक दिवसांपासून दापोडी परिसरातील ड्रेनेज तुंबल्याने रस्त्यावरुन सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधी असहाय्य झाली आहे. त्याचा नाहक त्रास स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत आहे. यामुळे हिवाळ्याच्या तोंडावर आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. मात्र, निवडणुकीच्या धामधुमीत महापालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

पुण्याकडून येताना पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या दापोडी परिसरात कष्टकरी, कामगार वर्ग मोठ्या संख्येने राहतो. मात्र, येथील मूलभूत सोई-सुविधांकडे महापालिका प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींचे सोईस्कर दुर्लक्ष झाल्याचे पहायला मिळत आहे. परिणामी अनेक समस्यांचा सामना येथील रहिवाशांना करावा लागत आहे. दिवाळीचा सण आणि हिवाळ्याच्या तोंडावर दापोडीकरांना वेगळ्याच समस्येने ग्रासले आहे. दापोडी परिसरातील बहुसंख्य भागात जुनाट स्वरुपाचे ड्रेनेज आहेत.

या ड्रेनेजची गेल्या अनेक दिवसांपासून साफसफाई झाली नाही. त्यामुळे ड्रेनेज तुंबलेले आहे. हे पाणी रस्त्यावरुन वाहत असून नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. हे पाणी दारासमोरुन वाहत असल्यामुळे नागरिक संतापले आहेत. ड्रेनेजच्या पाण्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटलेली आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दापोडीतील गटारे, चेंबर एवढेच नव्हे तर नाले देखील कचऱ्याने भरलेले आहेत. यामुळे पाऊस पडताच हे पाणी रस्त्यावरुन वाहून पाणी साचते. सखल भागात साचणाऱ्या या पाण्यामुळे साथीचे आजार होण्याची शक्‍यता आहे. महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी या नाल्यांची सफाई का केली जात नाही? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.