विधानसभेच्या तोंडावर पाण्याची पळवा-पळवी

पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात 100 टक्‍के पाणी असले तरी, महापालिकेच्या विरोधी पक्षांच्या नगरसेवकांच्या प्रभागात कमी दाबाने तसेच कमी पाणी सोडण्यात येत असल्याची तक्रार सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंगळवारी महापौर मुक्‍ता टिळक यांच्याकडे केली. मात्र, या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक वेठीस धरले जात असून तातडीने पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. दरम्यान, तक्रारी असलेल्या भागात तातडीने पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनास दिल्याची माहिती कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

शहरातील बऱ्याच भागांमध्ये अवेळी आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. हडपसर मतदारसंघातील मुंढवा, मगरपट्टा सिटी, कोंढवा, महंमदवाडी येथील नागरिकांना मागील काही आठवड्यांपासून हा फटका बसत आहे. यासोबत बाणेर, धनकवडी, वडगावशेरी, पुणे स्टेशन, भवानी पेठसह पर्वती आणि लष्कर जलकेंद्र परिसरासोबत मध्यवर्ती शहराच्या पूर्व भागातूनही पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून पाण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

यामुळे विधानसभेच्या तोंडावर पाणीपुरवठा विस्कळीत झाला असताना, अधिकाऱ्यांकडून वरून दबाव असून पाणी कमी देण्याच्या सूचना दिल्याचे खासगीत सांगण्यात येत आहे. परिणामी शहरात विधानसभेच्या तोंडावर पाण्याची पळवा पळवी सुरू झाल्याने पुणेकरांना मात्र, त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अधिकारी म्हणतात 1500 एमएलडी पाणी हवे
ऐन उन्हाळ्यात शहराला प्रतीदिन 1350 एमएलडी पाण्याची गरज असल्याचे सांगणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांनी आता पावसाळ्यात प्रतीदिन तब्बल 1500 एमएलडी पाणी आवश्‍यक असल्याचे महापौरांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले. त्यामुळे शहरासाठी एवढे पाणी घेतल्यास पालिकेस शहरासाठी तब्बल 20 ते 21 टीएमसी पाणी वर्षभर लागणार आहे. सध्याच्या पाणीकराराच्या दुप्पट हे पाणी आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here