बर्लिन -युरोपा लीग फुटबॉल स्पर्धेच्या बहुचर्चित अंतिम सामन्यात अखेर अपेक्षेप्रमाणे सेव्हिला संघाने विजय प्राप्त केला. सेव्हिला संघाने ही स्पर्धा जिंकताना अंतिम लढतीत बलाढ्य इंटर मिलान संघावर 3-2 अशी मात केली. स्पेनचा मानांकित फुटबॉल क्लब असलेल्या सेव्हिलाने गेल्या 9 स्पर्धांमधील हे चौथे विजेतेपद नोंदवले असून स्पेनमधील संघांनी स्पर्धेवर सातत्याने वर्चस्व राखले आहे.
सामन्याच्या 5 व्या मिनिटाला रोमेलू लुकाकुने गोल करत इंटरला आघाडी मिळवून दिली होती. मात्र, 12 व्या मिनिटाला ल्यु डी यॉंगने गोल केला व सेव्हिलाला बरोबरीत आणले. त्यानेच 33 व्या मिनिटाला आणखी एक गोल केला व संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, इंटरच्या डीएगो गोडिनने 35 व्या मिनिटाला गोल केला व पुन्हा संघाला बरोबरी मिळवून देत सामन्यात रंगत निर्माण केली.
या वेळी दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांचा बचाव भेदण्याचा प्रयत्न करत होते. 2-2 अशा बरोबरीवर पहिला हाफ संपला. दुसरा हाफ सुरू झाल्यावरही दोन्ही संघांना यश येत नव्हते. अखेर डीएगो कार्लोसने 74 व्या मिनिटाला गोल केला व सेव्हिलाला पुन्हा एकदा आघाडी प्राप्त करून दिली.