पुण्यावर गंभीर जलसंकट

-गरजेनुसार पाणीकोटा 17 टीएमसी होणे आवश्‍यक
-पाणीचोरीने पालिका हतबल, कारवाई मात्र शून्य
-गळती रोखण्यात अपयश, अनावश्‍यक वापर डोकेदुखी
-धरणे उशाला असूनही नागरिकांच्या घशाला कोरड

सुनील राऊत

पुणे –
तब्बल 30 टीएमसी पाणी क्षमता असलेली चार धरणे शहराच्या उशाला, जवळपास दोन टीएमसी साठवण क्षमता असलेले तलाव तसेच शहरात जागोजागी पाण्याची भरपूर पातळी असलेले सुमारे 30 ते 40 उच्छवास आणि विहिरी असतानाही; गेल्या काही वर्षांत पुणेकरांना जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला महापालिका दरवर्षी जवळपास 400 कोटी रुपयंचा खर्च करत असतानाही बेसुमार वाढलेले शहर, हद्दीजवळील गावांच्या पाण्याचा भार, नियोजनाचा अभाव, गळती रोखण्यात महापालिका आणि पाटबंधारे विभागाला येत असलेले अपयश, पाण्याचा अनावश्‍यक वापर आणि बेसुमार पाणीचोरी या मुळे पुणेकरांच्या घशाला गेल्या दशकभरात दरवर्षीच उन्हाळ्यात कोरड पडत असल्याचे वास्तव आहे. त्यातच उपलब्ध पाण्यावर आता भविष्यात पीएमआरडीए, विशेष बांधकाम प्रकल्पांनाही हिस्सा हवा असल्याने भविष्यात हे जलसंकट आणखी गंभीर होणार आहे.

6 टीएमसी पाण्याची नासाडी
शहरासाठी पुरेसे पाणी मिळत असल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून केला जात असला, तरी पाण्याची गळती आणि चोरीने तोंडचे पाणी पळाल्याचे वास्तव आहे. महापालिकेच्या जलवाहिनीतून सुमारे 3 टीएमसी, तर खडकवासला कालव्यातून वर्षाला जवळपास तेवढीच गळती होते. म्हणजे हे सहा टीएमसी पाणी कोणालाही मिळत नाही. त्यातच, महापालिकेच्या हद्दीजवळ सुरू असलेली मोठी बांधकामे तसेच नव्याने उभ्या राहिलेल्या नागरी इमारतींसाठी हद्दीजवळ पाणी चोरी होत आहे. त्यामुळे प्रामाणिक पुणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे.

उपनगरांची भिस्त टॅंकरवरच
महापालिकेला शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी आवश्‍यक यंत्रणा उभारता आली नाही. त्यासाठी नवीन जलवाहिन्या, नवीन पाण्याच्या टाक्‍या याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शहराची उपनगरे वर्षभर तहानलेलीच असतात. त्यातच शहराचा आकार बशी सारखा असल्याने केवळ मध्यवस्तीतच योग्य प्रकारे पाणी पुरवठा होतो. त्यामुळे उपनगरांची तहान वर्षभर ही टॅंकरवरच भागत असल्याचे वास्तव आहे. मागील वर्षभरात शहरात तब्बल 2 लाख 6 हजार टॅंकरच्या फेऱ्या झाल्या आहेत. या पूर्वी गेल्या तीन वर्षांत या फेऱ्या सरासरी 1 लाख 70 हजार ते 1 लाख 80 हजारांच्या आसपास होत्या. मात्र, यावर्षी त्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

साठा होतोय मर्यादित..

खडकवासला धरणसाखळीत 30 टीएमसी पाण्याची क्षमता आहे. या पाण्याचे नियोजन पुणे जिल्हातील सिंचन आणि गावांच्या पाणी पुरवठा योजना तसेच पुणे शहराच्या पाण्यासाठी करण्यात येते. मात्र, मागील काही वर्षांत दुष्काळाच्या स्थितीत धरणातील पाणी उजणी धरणात सोडणाचे न्यायालयाकडून बंधनकारक करण्यात आले आहे. त्यातच, आता पीएमआरडीए आणि नवीन मोठ्या निवासी योजनांसाठीही या धरणांच्या पाण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यातच, या धरणक्षेत्रात नवीन धरण बांधणे शक्‍य नाही. ही बाब लक्षात घेता, एका बाजूला शहराची पाण्याची मागणी वाढत असतानाच धरणसाठाही मर्यादित होत आहे. त्यामुळे पाण्यावरून वाद होण्याची शक्‍यता वाढली आहे.

-लोकसंख्या वाढली; कोटा मात्र तेवढाच
गेल्या दोन दशकांत शहराचा विकास वेगाने झाला आहे. सन 2000 मध्ये महापालिकेच्या हद्दीत 23 गावांचा नव्याने समावेश झाल्यानंतर हा शहरीकरणाचा वेग कमालीचा वाढला आहे. विशेषत: उपनगरांमध्ये आणि हद्दीजवळ स्थलांतरितांची संख्या वाढल्याने सन 2000 मध्ये 20 ते 21 लाख लोकसंख्या असलेले पुणे शहर 2020 च्या उंबरठ्यावर 50 लाख लोकसंख्येच्या पुढे गेले आहे. एवढया मोठ्या प्रमाणात लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रतिव्यक्‍ती 152 लिटर पाण्याचा निकष गृहीत धरला, तरी 15 टक्‍के गळती पकडून पुण्यासाठी 17 टीएमसी पाण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, 2007 पासून महापालिकेस शहरासाठी केवळ 11.50 टीएमसी पाणीच मिळत आहे. त्यातही शहराची गरज लक्षात घेता, 14 ते 15 टीएमसी पाणी घेतले जात असले तरी महापालिकेची पाणी वितरण व्यवस्था, शहराचा आकार यामुळे जवळपास 3 ते 4 टीएमसी पाण्याची ही निव्वळ गळती आहे. त्यामुळे शहराला पुरेसे पाणी हवे असल्यास हा कोटा 17 टीएमसी होणे आवश्‍यक आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.