न्यूयॉर्क : आजपासून साधारण 25 वर्षानी म्हणजे 2050 चा आसपास जगाला पाण्याची सर्वात भीषण समस्या जाणवणार असून सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या भारत, चीन आणि पाकिस्तान या देशांची पाण्याची समस्या जास्तच गंभीर होणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक पाण्याबाबत आपला एक ताजा अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
2050 पर्यंत जगाच्या पाठीवर राहत असलेल्या अडीचशे कोटी नागरी लोकसंख्येला पाण्याची गंभीर समस्या जाणवणार आहे असे या अहवालात म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र विश्व जल रिपोर्ट नावाच्या या अहवालामध्ये 2050 पर्यंत जगातील अनेक नद्यांचे पाणी कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालात विद्यमान स्थितीचाही आढावा घेण्यात आला असून आशिया खंडातील 80% लोकसंख्याला सध्या पाण्याची गंभीर टंचाई जाणवत असल्याचे म्हटले आहे.
पूर्वोत्तर चीन, भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये सध्याही पाण्याची स्थिती अत्यंत वाईट असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. सध्या जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 26 टक्के लोकसंख्येला पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध होत नसल्याचेही या अहवालात म्हटले असून फक्त 46 टक्के लोकसंख्येलाच चांगले पाणी उपलब्ध होते. असाही उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे.
सध्या सुमारे 200 ते 300 कोटी लोकसंख्येला वर्षभरातून किमान महिनाभर पाण्याच्या गंभीर टंचाईचा सामना करावा लागतो असेही अहवालात म्हटले आहे. पाण्याची टंचाई ही एक वैश्विक समस्या असून जगातील सर्वच देशांनी हा अहवाल गांभीर्याने घेऊन आगामी कालावधीमध्ये पाण्याचा वापर योग्य प्रकारे करण्याबाबत उपाययोजना करायला हव्यात असे या अहवालात सुचवण्यात आले आहे.