अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला सात वर्षे सक्तमजुरी

पुणे – अल्पवयीन मुलीला पळवून नेवून लैंगिक अत्याचार करणाऱ्याला सात वर्षे सक्तमजुरी आणि 18 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.आर.पूरवार यांनी सुनावली. दंडांपैकी 15 हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावेत, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

सुनील दिनेश भडकवाड (वय 30) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. जुलै 2016 मध्ये हा प्रकार घडला. पीडित 17 वर्षीय मुलीच्या आईने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील एन. डी. पाटील (धायगावे) आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता हेमंत मेंडकी यांनी काम पाहिले.

वानवडी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही.घाटे यांनी या प्रकरणाचा तपास केला.त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी हवालदार ए. एस. गायकवाड आणि पी.पी. पवार यांनी मदत केली. भडकवाड याने फूस लावून अल्पवयीन पीडितेला उस्मानाबाद येथे पळवून नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर भारतीय दंड संहिता कलम 363,366 आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार शिक्षा सुनावली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.