तरूणाने केला बलात्कार : त्याला या कृत्यासाठी महिलेने केली होती मदत
पुणे- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला आणि त्याला या कृत्यासाठी मदत करणाऱ्या महिलेला प्रत्येकी 7 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी हा आदेश दिला आहे.
दत्ता किसन बर्डे (वय 26) आणि ललिता अनिल भंडलकर (वय 32, दोघेही, रा. मांडवगणफराटा, ता. शिरूर) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यापैकी बर्डे याला 5 हजार रुपये दंड सुनावण्यात आला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागणार आहे. तर, ललिता हिला 3 हजार रुपये दंड सुनावण्यात आला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागणार आहे.
याबाबत पीडित 17 वर्षीय मुलीने शिरूर पोलिसात फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी महिला पोलीस नाईक प्रतिमा भांड, हवालदार मोरे आणि पैरवी अधिकारी शिंदे यांनी मदत केली.
ही घटना 20 जानेवारी 2013 रोजी घडली. फिर्यादी ललिता हिच्यासह कुरणामध्ये सरपण आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी बर्डे तेथे गेला. फिर्यादीपासून थोडे अंतरावर सरपण तोडणाऱ्या ललिताकडे तो गेला. त्यानंतर ललिता फिर्यादीकडे गेली. तिने बर्डे याच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास तिला सांगितले. त्यावेळी बर्डे तिथे गेला. तिच्या शरीराशी झटू लागला. त्यावेळी तिने त्यास नकार दिला. त्यावेळी त्याने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला.
याबाबत कोणाला सांगितल्यास, तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने कोणाला काही सांगितले नाही. त्यानंतर तिला थकवा जाणवत होता. त्यामुळे ती सारखी झोपत होती. त्यावेळी आईने विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी या प्रकरणात तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर युक्तीवाद करताना दोघांना अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ऍड. पाठक यांनी केली.