बडोदा – गुजरातच्या बडोदा जिल्ह्यात फरतीकुई गावात एका हॉटेलचे पाणी वाहून नेणाऱ्या गटाराची साफसफाई करताना त्यातील विषयारी वायुमुळे गुदमरून सात जणांचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. त्यातील चार जण गटार साफ करणारे सफाई कामगार आहेत. यात हॉटेलचे तीन कर्मचारीही मृत्युमुखी पडले आहेत.
या घटनेच्या संबंधात माहिती देताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की हे गटाराचे चेंबर साफ करण्यासाठी प्रथम एक कामगार आत उतरला. तो बराच वेळ बाहेर आला नाही म्हणून दुसरा कामगार आत उतरला. असे एकेक करीत सात जण तेथे आत उतरले आणि ते सातही जण तेथे बेशुद्ध होऊन मरण पावले. या प्रकाराची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तिकडे पाचारण करण्यात आले. त्यांनी तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आतील सात जणांचे मृतदेह बाहेर काढले..