सांगली: सांगलीतील इस्लामपूरमध्ये सापडलेल्या चार करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात ३४ जण आल्याचे आढळून आले आहे. जिल्हा आरोग्य विभागाने यापैकी सात जणांना ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांच्यात करोनाची लक्षणे आढळून आली नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, इस्लामपूर येथील चार जण दि. 13 रोजी सौदी अरेबियातून भारतात आले होते. त्यांना इस्लामपूरमध्ये होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. या चार जणांना करोनाची लागण झाल्याचे सोमवारी सायंकाळी स्पष्ट झाले होते. त्यांना उपचारासाठी मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालत दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान जिल्ह्यात एकदम चार रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. या रुग्णांच्या आतापर्यंत ३४ जण संपर्कात आल्याचे आढळून आले आहे. यापैकी रुग्णांच्या जवळच्या सात नातेवाईकांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आले आहे.
यावेळी करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीमध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची करोनाची लागण झाली नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. मात्र, या सर्वांच्यावर आरोग्य यंत्रणा नजर ठेवून आहे. त्याचबरोबर जे चार करोना बाधित रुग्ण आहेत. त्यांच्या संपर्कात आलेले डॉक्टर, परिचारीका व अन्य नागरिकांची देखील तपासणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, जिल्ह्यात चार करोना रुग्ण आढळून आल्याने सांगली, मिरज आणि इस्लामपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी रस्त्यावरुन फिरणार्या नागरिकांना पोलिसांनी चांगलेच बदडून काढले. यापैकी काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.