300 रुग्णांना लागण ; 371 रुग्णांना एकाच दिवशी डिस्चार्ज
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरात एकाच दिवशी सात रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. तर 300 नवीन रुग्णांना करोनाची लागण झाली. त्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 5493 इतकी झाली आहे. तर सद्यस्थितीत शहरात 2009 रुग्ण उपचाराधीन आहेत.
शहरातील सर्वच भागात करोनाचा शिरकाव झाला आहे. आज शहरातील 290 रुग्णांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील 10 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने कालच पाच हजारांचा टप्पा ओलांडला तर आज साडेपाच हजारांच्या उंबरठ्यावर जाऊन रुग्णसंख्या पोहचली आहे. बुुधवारी एकाच दिवशी सात रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये देहूरोड किवळे, गांधीनगर येथील दोन महिलांचा समावेश आहे. तर काळेवाडी, घरकुल चिखली, दापोडी येथील तीन पुरुषांचा मृत्यू झाला. तसेच शहराबाहेरील धुळे येथील पुरुष व बावधन खुर्द येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 111 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 77 रुग्णांचा समावेश आहे, तर शहराबाहेरील 34 रुग्णांचा समावेश आहे.
परिस्थिती धोकादायक वळणावर
शहरातील करोनाची स्थिती गंभीर होऊ लागली आहे. आज मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांपैकी चार रुग्ण हे पन्नास वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. 36 वर्षीय पुरुषाचाही मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या वतीने अँटीजेन टेस्ट किटच्या माध्यमातून नागरिकांची चाचणी केली जात आहे. तसेच लॅबही सुरु करण्यात आली आहे. असे असतानाही बुधवारी तब्बल 1822 रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
आज रुग्णालयात 2610 रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. मात्र महापालिका आणि खासगी रुग्णालयांचे करोनासाठी आरक्षित बेड मिळून संख्या सुमारे 2100 इतकी होत आहे. त्यामुळे रुग्णांना बेड मिळत नसल्याचे वास्तव आहे. तसेच नवीन रुग्णांना भरती करण्यासाठी पहिल्या रुग्णांना अवघ्या दोन-तीन दिवसांत सोडण्यात येत आहे.
आज एकाच दिवशी तब्बल 371 रुग्णांना घऱी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील करोनाची परिस्थिती धोकादायक वळणावर पोहचल्याचे दिसून येत आहे. वाढत्या रुग्णांची संख्या पाहता परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनीच जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.