सातशे मृतदेह वर्षभर अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत

न्यूयॉर्क : अमेरिकेतील करोना महामारीची तीव्रता कमी होत असली तरीही गेल्या वर्षी या महामारीने अमेरिकेला दिलेल्या तडाख्याच्या काही खुणा अद्यापही शिल्लक राहिल्या आहेत. गेल्या वर्षी या महामारीमुळे मृत्यू पावलेल्या 700 रुग्णांवर अद्यापही अंत्यसंस्कार करण्यात आलेले नसून त्यांचे मृतदेह न्यूयॉर्क शहरांमध्ये रेफ्रिजरेड ट्रक्समध्ये गेल्या वर्षभरापासून पडून आहेत.

गेल्या वर्षी महामारीची तीव्रता मोठ्या प्रमाणावर असताना अमेरिकेत मृत्यूचे प्रमाणही जास्त होते त्यावेळी मृतदेह कोठे ठेवायचे हा प्रश्न निर्माण झाल्यावर तात्पुरत्या स्वरूपात ट्रक्स मध्ये मृतदेह ठेवण्यात येत होते. हे सर्व ट्रक्स रेफ्रिजरेटेड असल्यामुळे मृतदेह सुरक्षित राहात होते. अशा प्रकारचे 700 मृतदेह अद्यापही न्यूयॉर्क शहराच्या बाहेर ट्रक्समध्ये कायम आहेत. मृत्यू पावलेल्या  या रुग्णांच्या नातेवाईकांनी आत्तापर्यंत या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याबाबत कोणताही निर्णय प्रशासनाला न दिल्याने हे मृतदेह गेल्या वर्षभरापासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत आहेत.

शहराच्या बाहेर एका शेतामध्ये खड्डे खणून या मृतदेहांवर दफन विधी करणे प्रशासनाला सहज शक्य आहे. पण अशा प्रकारच्या दफनविधीसाठी नातेवाईकांनी परवानगी देणे गरजेचे आहे. अमेरिकेतील माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांप्रमाणे करोनामुळे मरण पावलेल्या रूग्णांवर अंत्यसंस्कार न झाल्याचे प्रमाण यापेक्षाही जास्त असू शकते अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत असणाऱ्या मृतदेहांची संख्या 2 हजार पेक्षा जास्त असू शकते असेही काही माध्यमांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.