खडापारशी सुळक्‍यावर सात तास थरार

पुण्यातील एस. एल. ऍडव्हेंचर संस्थेच्या गिर्यारोहकांची यशस्वी चढाई, 450 फूट उंच खडापारशी चढाई 

वेल्हे – एस. एल. ऍडव्हेंचर या पुणेस्थित संस्थेच्या 7 गिर्यारोहकांनी शनिवारी (दि. 7) तब्बल 450 फूट उंच खडापारशी या अत्यंत कठीण अशा सुळक्‍यावर 7 तासांत यशस्वी चढाई केली. लहू उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली आखली गेलेली ही मोहीम रॉक क्‍लाइम्बिंगच्या क्षेत्रातील एक अवघड मोहीम म्हणून ओळखली जाते.

सकाळी साडेनऊ वाजता वजीर वीर कृष्णा मरगळे यांनी लीड क्‍लाइम्बिंगला सुरुवात केली, त्यांना बिले दिला लहू यांनी. या मोहिमेत एक ठरविण्यात आले होते की, सर्वच्या सर्व 7 गिर्यारोहक 7 तासांत 7 तारखेला एकाचवेळी सुळक्‍याच्या शिखरावर पोहचायचे. ठरल्याप्रमाणे सगळे या अवघड सुळक्‍यावर चढाई करत होते. अगदी शेवटच्या टप्प्यावर शिखरापासून अंदाजे 20 फूट चढाई बाकी होती. सर्व गिर्यारोहक अत्यंत कमी जागेत स्वतःला अँकर करून थांबले होते. ऊन मी म्हणत होते, पाणी संपत आले होते. दुपारच्या जेवणाचा प्रश्‍नच नव्हता, यश समोर दिसत होते.

शिखरावर चढाई सुरू केली, चढण्यासाठी कृष्णाने कपारीत हात घातलाच होता की, तिथे एक अत्यंत विषारी मण्यार जातीचा साप दडी मारून बसला होता. एक पट्टीचा ट्रेकर हा सर्पमित्रही असतो आणि या अनुभवाचा अंदाजे 400 फूट उंचावर जिथे पळून जाण्यास एक इंचदेखील जागा नव्हती तिथे उपयोग झाला. सर्वांनी मिळून त्या सापास बाजूला वाट करून दिली आणि चढाई पुन्हा सुरू केली. कृष्णा मरगळे आधी शिखरावर पोहोचला.

त्यानंतर मानसिंह आणि लहू उघडे जात असताना अचानक ज्याला पकडले होते तोच मोठा दगड निखळून खाली आला. लहूने क्षणही वाया न घालवता बिलेवर येऊन तो तसाच दाबून धरला आणि खाली उभ्या असलेल्या सहकाऱ्यांना वाचवले. त्यानंतर भारती विद्यापीठाचे शिरीष कुलकर्णी, तुषार आणि रोहित अंतोडगी यांनी शिखरावर भगवा फडकवला. हैदराबादेतील पीडितेला श्रद्धांजली तसेच डॉ. पतंगराव कदम यांना शिखरावर आदरांजली वाहण्यात आली. शिवगर्जना करून सर्वजण रॅपलिंग करून हे सात गिर्यारोहक खाली उतरले ते नानाच्या अंगठ्याकडे पाहतच.

 

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)