नव्या विषाणूची दहशत; भुतानमध्येही सात दिवसांचा लॉकडाऊन

थिम्पू – ब्रिटनमध्ये नवा विषाणू सापडल्याने लॉकडाऊन जाहीर केला आहे. आता भारताचा शेजारी असणारा देश भूताननेही सात दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे.

तर दुसरीकडे दक्षिण अफ्रिकेत करोना व्हायरसचा नवा विषाणूचा संसर्ग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पाच देशांनी दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. नव्या करोनाची वाढती दहशत लक्षात घेवून भुतानच्या पंतप्रधान कार्यालयाने लॉकडाऊनची नवी नियमावली जाहीर केली आहे.

भुतानमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे कोणी उल्लंघन करताना दिसला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. करोनाचे झोन निश्‍चित करण्याबाबात सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

कडक अंमलबजावणीचे आदेश देतानाच टास्क फोर्स उभारण्याचेही सांगण्यात आले आहे. प्रभावी यंत्रणेची कार्यक्षमता अधिक वाढविण्यास सांगण्यात आले आहे. तसेच करोना झोन सिस्टीम कार्यान्वित करण्यासाठी त्या त्या जिल्ह्यांच्या प्रशासनाकडे निर्णय सोपविण्यात आला आहे.

विभागानुसार शाळा, संस्था, कार्यालये आणि दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. तर नव्या नियमावलीनुसार अत्यावश्‍यक दुकाने आणि आवश्‍यक सेवा सुरु राहणार आहेत. त्याबाबत तशी परवानगी देण्यात आलेली आहे. आजपासून थिम्पूमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

देशभरात जनावरांच्या चाऱ्यासह वस्तू, भाजीपाला आणि इतर आवश्‍यक वस्तूंच्या पुरवठ्यात कोणताही अडथळा येणार नाही. सर्व वस्तूंच्या आयात आणि निर्यातीत कमीतकमी व्यत्यय आणण्याची सुविधा सरकार सुलभ करेल आणि सुनिश्‍चित करेल, असे सांगण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.