लोणावळा – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लोणावळा शहरातील एकूण पाच जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच त्यांना 7 दिवसांच्या सध्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा शहरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 52 जणांवर लोणावळा शहर पोलिसांकडून आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 41 दुचाकी आणि चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे. संचारबंदी उल्लंघन कारवाई करण्यात आलेल्या 52 जणांपैकी एकूण पाच जणांना आतापर्यंत वडगाव मावळ न्यायालयाने प्रत्येकी एक हजार रुपये दंड व 7 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.
करोनामुळे सर्वाधिक बाधित झालेल्या मुंबई आणि पुणे या दोन महानगरांबरोबर मध्ये असलेल्या पर्यटन नगरी लोणावळा शहरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी कडक धोरण अवलंबण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करीत असतानाच पुणे-मुंबईकडून लोणावळ्यात येऊ पाहणाऱ्या लोकांना सुद्धा लोणावळा पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
मुंबई आणि पुण्याकडील अनेक धनिकांचे बंगले लोणावळा शहरात आहेत. ते जर इकडे येणार असेल तर त्यांनी आपल्यासोबत प्रशासनाचे आवश्यक पास सोबत बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज यादव यांनी दिली आहे.