देशातील सात कोटी घरांमध्ये अद्याप टीव्ही नाही

श्रीनगर – देशातील एकूण सुमारे 25 कोटी घरांपैकी 18 कोटी घरांमध्ये टीव्ही संच असून अद्याप 7 कोटीघरांमध्ये टीव्ही नाही. तथापी लवकरच या घरांमध्येही टीव्ही येणार असून तसे झाले तर इतक्‍या मोठ्या संख्येत प्रत्येक घरांमध्ये टीव्ही असणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश ठरणार आहे असे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

आज काश्‍मीरात त्यांच्या हस्ते मोफत डीश टीव्हीचे सेट टॉप बॉक्‍सेस वाटपाचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. काश्‍मीरातील नव्या डीडी वाहिनीच्या सिग्नेचर टोनचे प्रकाशनही आज जावडेकरांच्या हस्ते झाले. त्यांच्या उपस्थितीत काश्‍मीरातील दूरचित्रवाणी वाहिनीवरील डोगरी भाषेतील पहिल्या बातमी पत्राच्या प्रकाशनालाही सुरूवात झाली. ते म्हणाले की देशात दूरचित्रवाणी वाहिन्यांचा प्रसार गेल्या तीन दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात झाला.

1970 साली देशात केवळ दूरदर्शन ही एकच वाहिनी होती आता असंख्य वाहिन्यांचे प्रसारण होत आहे. खासगी वाहिन्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने टीव्ही प्रसारणात देशात एक मोठी क्रांतीच झाली आहे. आज मितीला सातशे टीव्ही चॅनेल्स कार्यरत आहेत अशी माहितीही मंत्र्यांनी यावेळी दिली. केबल टीव्हीच्या माध्यमातूनच टीव्हीचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला असे ते म्हणाले. केबल टीव्ही व्यवसायात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नव्हता म्हणूनच या क्षेत्राचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.