प्रतापसिंह हायस्कूलच्या दुरुस्तीसाठी सात कोटींचा निधी

सातारा  – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि 7 नोव्हेंबर 1900 रोजी येथील प्रतापसिह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतल्याने हा दिवस राज्यात विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा नियोजन समितीकडून हायस्कूलच्या इमारतीची देखभाल व दुरुस्तीसाठी सात कोटी रुपये मंजूर झाले आहेत. नियोजित कामे लवकर पूर्ण केले जातील, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती राजेश पवार यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी साताऱ्यातील प्रतापसिह हायस्कूलमध्ये (सातारा हायस्कूल) प्रवेश घेतला होता. या दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी 7 नोव्हेंबरला शासन व जिल्हा परिषदेच्यावतीने विद्यार्थी दिन साजरा केला जातो. यंदाच्या कार्यक्रमास कृषी समितीचे सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती समितीचे शिवाजी सर्वगौड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, संदीप शिंदे, पत्रकार अजित जगताप, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण धस्के, राजस्थानचे अजय जयपाल, मुख्यध्यापक संमती देशमाने व मान्यवर उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शाळा प्रवेश करून इतिहास रचला. वीस वर्षांपूर्वी ए. के. गायकवाड, ऍड. विलास वहागावकर, वामनराव मस्के, दत्तात्रय पवार, मनोहर पवार, रमेश इंजे, दिनकर झिंब्रे, गौतम भोसले, गोरख बनसोडे आदी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी शाळा प्रवेशदिन सोहळ्याचे रोपटे लावले होते. आता त्याचा वटवृक्ष बनत आहे. संपूर्ण राज्यात प्राथमिक शाळांमध्ये हा दिवस साजरा करण्याचा आदेश शासनाने पारित दिला आहे; पण काही राजकारणी मंडळी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्याचा विसर पडल्याची खंत प्रवीण धस्के यांनी व्यक्‍त केली.

दरम्यान, यानिमित्त विद्यार्थ्यांना गणवेश व खाऊवाटप करण्यात आले. यावेळी पालक व आंबेडकरी चळवळीचे अनुयायी जमले होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नोंदणी पुस्तक पाहिले व शाळेच्या आवारातील सुधारणा पाहून समाधान व्यक्‍त केले. उत्तम साळुंखे, निखिल चौगुले, गायत्री पवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.