मलवाहिनी कामासाठी सात ठेकेदार कंपन्या पात्र

“जायका’च्या माध्यमातून मुळा-मुठाच्या डाव्या तीरावर 33 कि.मी.ची मलवाहिनी

पुणे – जपानस्थित जायका कंपनीच्या सहकार्यातून राबविण्यात येणाऱ्या नदी सुधार प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नदीच्या डाव्या तिरावर 33 कि.मी.ची मलवाहिनी टाकण्यासाठी ठेकेदारांची पूर्व पात्रता जाणून घेण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण विभागाने फेरनिविदा काढली आहे. महापालिकेने या दोन्ही नद्यांच्या उजव्या तिरावरील मलवाहिनीसाठी यापूर्वीच निविदा काढली असून, सात ठेकेदार कंपन्या पात्र ठरल्या आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी मदन आढारी यांनी दिली.

नदी सुधार योजनेअंतर्गत शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते मुळा-मुठा नदीत सोडण्यात येणार आहे. यासाठी जायका कंपनीने केंद्र शासनाच्या माध्यमातून सुमारे 900 कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेअंतर्गत दोन्ही काठांवर नवीन 11 सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारण्यात येणार असून, शहराच्या विविध भागांत निर्माण होणारे मैलापाणी गोळा करून ते या केंद्रांपर्यंत आणण्यासाठी नद्यांच्या दोन्ही तिरावर मलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. मुळा-मुठा नदीच्या उजव्या तिरावर मलवाहिन्या टाकण्याच्या कामासाठी इच्छुक ठेकेदारांची पूर्व पात्रता जाणून घेण्यासाठी निविदा काढली होती. सात ठेकेदार यासाठी पात्र ठरले आहेत. मात्र, डाव्या तिरावरील कामासाठी काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून फेरनिविदा काढण्यात आली आहे.

तसेच, एसटीपी प्लान्ट उभारण्यासाठी सहा पॅकेजेस करण्यात आली आहेत. त्यापैकी 4 पॅकेजमधील 6 एसटीपी केंद्रांची निविदा मान्य झाली असून, कामेही सुरू झाले आहेत. उर्वरीत दोन पॅकेजमध्ये पाच एसटीपी केंद्र उभारण्यात येणार असून, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. येत्या कालावधीत या प्रकल्पाचे काम अधिक वेगाने सुरू होईल, असेही आढारी यांनी नमूद केले.

एसटीपीतील पाण्याचा पुनर्वापर
प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा उद्यान, बांधकाम, रेल्वे, शेती अथवा अन्य कारणास्तव करता येतो. या योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या एसटीपी प्लान्टमध्ये प्रक्रिया केलेले पाणी पुनर्वापरासाठी अधिकाअधिक उपयुक्‍त ठरेल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या पाण्याचा वापर कोणकोणत्या कारणास्तव करता येईल. यासाठी कोणती यंत्रणा उभारावी लागेल, याचा अभ्यास करण्यात येत आहे. मैलापाणी केंद्रातील पाण्याचा वापर अन्य कारणासाठी झाल्यास पिण्यासाठीच्या पाण्यात बचत होणे शक्‍य होणार आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासन काम करत असल्याचे मदन आढारी यांनी नमूद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)