पुणे – अनधिकृत बांधकामांविरोधात मुंढवा-केशवनगर या भागांमध्ये महापालिकेने कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
त्याचबरोबर येथील स्थानिक पोलिसांचादेखील संरक्षण घेण्यात आले. या कारवाईमध्ये सात इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या असून एकूण सुमारे पंचवीस हजार चौरस फूट एवढे बांधकाम पाडण्यात आले. हे सर्व बांधकाम पक्क्या स्वरूपाचे आरसीसी स्वरूपात होते.
या कारवाईसाठी महापालिकेने अत्याधुनिक मशिनरी चा वापर केला यामध्ये कटर मशीन व पोकलेन तसेच इतर संबंधित साहित्य सामग्रीचा वापर करण्यात आला. या कारवाईसाठी महापालिकेकडून उपअभियंता, कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
कारवाई करताना येथील नागरिकांनी कारवाईस प्रखर विरोध केला परंतु स्थानिक पोलीस व अतिक्रमण विभागाकडील पोलीस यांच्या सहकार्याने सदर विरोध डावलून महापालिकेकडून कारवाई यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. अशा स्वरूपाच्या कारवाईमुळे या भागातील अनधिकृत बांधकामे थांबविण्यात महापालिकेला यश मिळणार आहे.