सेवा सोसायटी शेतकऱ्यांची कामधेनू

नगर  -केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा सहकारी बॅंकेच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून होते. त्यामुळे सेवा सोसायटी शेतकऱ्यांची कामधेनू आहे. शेतकऱ्यांपर्यंत लाभार्थी योजना पोहोचविण्यासाठी सोसायटीचे चेअरमन व सचिवांनी दक्षता घ्यावी, असे विचार माजी मंत्री तथा जिल्हा बॅंकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव कर्डिले यांनी केले. 

नगर तालुक्‍यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन व सचिवांच्या बैठकीत ते बोलत होते. बाजार समितीचे सभापती अभिलाश घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सुरेश सुंबे, उपाध्यक्ष छत्रपती बोरुडे, संचालक विलास शिंदे, दिलीप भालसिंग, भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, बाळासाहेब निमसे यांच्यासह सोसायटीचे पदाधिकारी व सचिव यावेळी उपस्थित होते.

माजी मंत्री कर्डिले म्हणाले, ”जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करावा. जिल्हा सहकारी बॅंकेने शेतकऱ्यांना 10 गायी घेण्यासाठी दीड लाख रुपये कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवा.

प्रत्येक गावातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. जिरायईत भागामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. दूध व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार तसेच जिल्हा बॅंकेने आर्थिक स्वरुपात मदत करण्याचे निर्णय घेतले आहेत.”

सोसायटीच्या सचिवांनी प्रामाणिकपणे काम केल्याने शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ झाला. शेतकऱ्यांना 1400 कोटी रुपयांची कर्जमाफी झाली, असेही ते म्हणाले. करोनाच्या काळात शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याने जिल्हा बॅंकेने विविध निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केल्याचेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.