पुणे – स्वातंत्र्यदिन आणि शहराला “हाय अलर्ट’ दिल्याने शहराच्या बंदोबस्तामध्ये मोठी वाढ करण्यात आली. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील प्रशासकीय कार्यालये, संवेदनशील ठिकाणी विशेष पथके तैनात केली असून सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
रेल्वे स्थानकाच्या परिसरात नागरिकांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे स्थानक परिसरामध्ये आरपीएफ, जीआरपीसह 30 विशेष रेल्वे पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. तर, शिवाजीनगर, हडपसर, खडकी, देहूरोड, चिंचवड आदी स्थानकांवर देखील विशेष पथक नेमण्यात आले आहे.
रेल्वे स्थानक परिसरातील कानाकोपऱ्यांत बुधवारी श्वान पथक आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून कसून तपासणी करण्यात आली. यासह प्रत्येक प्रवाशांच्या साहित्याची तपासणी स्कॅनरद्वारे करण्यात आली. आरपीएफचे सहायक सुरक्षा आयुक्त बी.के.मकरारिया यांच्या नेतृत्वामध्ये निरीक्षक सुहास कांबळे, महेश कवडे, सुरेन्द्र रेड्डी, एम.सोनावणे यांच्यासह स्थानक परिसरामध्ये 30 कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे.