पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विद्यापीठ व महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात “सेट’चा निकाल तब्बल चार महिन्यानंतर सोमवारी जाहीर करण्यात आला. या निकालात एकूण ७ हजार २७३ उमेदवार पात्र ठरले असून, त्याची टक्केवारी ६.६६ इतकी आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे हा निकाल सोमवारी सायंकाळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला. या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच उत्तीर्णांना त्यांचे प्रमाणपत्र विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून लगेचच डाऊनलोड करता येणार आहे.
दि. ७ एप्रिल रोजी १७ शहरांमधील विविध महाविद्यालयात ३९ व्या सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत महाराष्ट्र आणि गोव्यातील एक लाख ९ हजार २५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
यंदा एसईबीसी प्रवर्गाचा निकालात समावेश करायचा की नाही, याबाबत राज्य शासनाकडून माहिती येण्यास विलंब झाला. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला.