माघार, की उमेदवारांना डोकेदुखी?

आज अर्ज माघारीची मुदत : बंडोबांचा अंतिम फैसला

पुणे – उमेदवारी न मिळाल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांतील इच्छुकांनी बंड करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी आघाडी आणि युतीचे वरिष्ठ नेते सरसावले असले, तरी बंडोबांचा अंतिम फैसला सोमवारी होणार आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोण माघार घेणार आणि कोण शड्डू ठोकून आपल्याच पक्षाच्या प्रतिस्पर्ध्याला आव्हान देणार, हे स्पष्ट होणार आहे.

2014 मध्ये आघाडी आणि युती तुटल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यामुळे यावेळी पुन्हा सर्व पक्ष स्वतंत्र लढतील, या आशेवर चारही पक्षांमधील इच्छुकांनी गेल्या पाच वर्षांत मोठी तयारी केली होती. मात्र, यावेळी लोकसभा निवडणुकीतच आघाडी आणि युती जाहीर झाल्याने सर्वच पक्षातील इच्छुकांची कोंडी झाली आहे. त्याचे पडसाद पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील जागावाटपानंतर उमटले.

भाजपला सर्व आठही जागा मिळाल्याने शिवसेनेच्या इच्छुकांनी खडकवासला, हडपसर, वडगावशेरी तसेच कसबा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर पर्वती, कसबा या विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या नाराजांनी अर्ज भरले आहेत. याच स्थितीचा सामना भाजपला कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातही करावा लागला असून येथूही शिवसेनेसह भाजपच्याही नाराजांची उमेदवारी दाखल केली आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात थेट ब्राह्मण महासंघाकडूनच उमेदवार रिंगणात उतरवला आहे. पण, संघटनेने पाटील यांना पाठिंबा दिल्याचे पत्रक शनिवारी दिले. पण, त्यात उमेदवार माघारीबद्दल काहीही स्पष्टता नाही. त्यामुळे सर्वच मतदारसंघांत राजकीय पक्षांची बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढली आहे.

पदाधिकाऱ्यांची धावपळ
बंडखोरी मोडीत काढण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांची धावपळ सुरू होती. त्यासाठी ज्येष्ठ नेते या इच्छुकांच्या मनधरणीसाठी त्यांच्या घरी जाऊन भेटी घेत आहेत. काहींनी त्याला प्रतिसाद दिला, तर काहींनी नेत्यांची भेट घेणे टाळत पुन्हा सूचक कृती केली आहे. तरीही सोमवारी सकाळपर्यंत सर्व बंडखोरांची मनधरणी करून ते पक्षाचे काम करतील, असे सांगण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.