पुणे – राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर महिलांसाठी स्वच्छता गृह उभारण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. त्यासाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. त्यावेळी फडणवीस यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने प्रवासादरम्यान महिलांना होणाऱ्या त्रासाबाबत लक्ष वेधले. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यासह मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.
सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. पुण्यात नद्यांमध्ये केमिकलयुक्त सांडपाणी सोडले असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील मुलींना प्रोत्साहन भत्ता दिला जातो तो एक रुपया आहे. यात राज्यस्तरीय योजना राबवून डीबीटीद्वारे पैसे विद्यार्थ्यांना देण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती देखील डॉ. गोऱ्हे यांनी केली.
पुणे जिल्हा तीर्थक्षेत्र विकास आराखडा याबाबत शासनाने ठरविलेल्या धोरणाबाबत अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे. यात राज्य शासनाने पुढाकार घेऊन पुरातत्व खात्याकडे असलेल्या तीर्थक्षेत्राचा विकास होण्यासाठी एकत्र नियोजन करण्यासाठी पाठपुरावा घ्यावा अशी डॉ. गोऱ्हे यांनी सूचना केली.