मुंबई – मुंबई महानगरातील प्रदूषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित राहण्यासाठी दिल्ली, गुडगाव, लखनौप्रमाणे एअर प्युरीफायर टॉवर पालिकेने बसवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना दिले. तसेच यासह, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी करणे, महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण या विषयांचा अतंर्भाव मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करावा, असे निर्देशही शिंदे यांनी महापालिका आयुक्त आय.एस. चहल यांना दिले.
मुंबई महापालिकेचा सन 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प लवकरच सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महापालिका अर्थसंकल्पात कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य द्यावे, याबाबत महापालिकेला सूचना केल्या आहेत. त्यात प्रदूषण नियंत्रण आणि आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण या मुद्द्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर शहरी वनीकरण वाढेल यासाठीही उपाययोजन करण्याचे शिंदे यांनी सुचवले आहे.
मधुमेहाच्या रुग्णांची घरोघरी जाऊन तपासणी
मुंबईतील सुमारे 27 टक्के नागरिक मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांची घरोघरी जाऊन तपासणी करून त्यांचा डेटा तयार करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. हा ताण कमी करण्यासाठी बाह्ययंत्रणांची मदत घेतानाच खिडक्यांची संख्या वाढवावी. तसेच एमआरआय, सीटीस्कॅन आणि निदान केंद्र वाढविण्याच्या तसेच डायलिसीस केंद्र उभारण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या आहेत.
Maharashtra : साप-विंचू दंशास नुकसान भरपाई नाही; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
कौशल्य विकास केंद्र सुरू करा
मुंबई महापालिकेच्या प्रत्येक शाळेत इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करावे. मुंबई पब्लिक स्कूलची मागणी पाहता त्यांची संख्या वाढवावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिले आहेत.