आधी कोटा निश्‍चित करा, मगच करार

पालिका-पाटबंधारे विभागात पुन्हा जुंपण्याची चिन्हे

पुणे – शहराला पाणीपुरवठा करण्याची महापालिका आणि पाटबंधारे यांच्यातील पाणी कराराची वाढीव मुदत शनिवारी संपत आहे. त्यावर पाटबंधारे विभागाने आधी शहराचा कोटा मंजूर करावा, त्यानंतरच सुधारित करार करावा अशी भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे.

या कराराचा मसूदा जुना असल्याने तो सद्यस्थितीनुसार सुधारीत करावा, अशा सूचना जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने दिल्या आहेत. त्यानुसार हा करार व्हावा, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. तसेच त्याबाबतचे पत्रही पाटबंधारे विभागाकडे पाठविले आहे.पाणीकराराची मुदत 28 फेब्रुवारी रोजी संपली. शहरासाठी वर्षाला 11.50 टीएमसी पाणी देण्याचा हा करार होता. मात्र, तो संपतानाच पालिकेने शहराची लोकसंख्या तसेच पाण्याची गरज लक्षात घेता पाणीकोटा 17 टीएमसी करावा, अशी मागणी केली. त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे पालिकेने करारास 31 ऑगस्ट 2019 पर्यंत मुदतवाढ मागितली होती. पाटबंधारे विभागानेही त्यास मान्यता दिली. मात्र, आता शासनाकडून कोटा निश्‍चित होण्यापूर्वीच कराराची मुदतवाढही संपलेली आहे.

शासनाच्या भूमिकेकडेही लक्ष
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहराचा पाणी करार संपला असून गेल्या काही दिवसांपासून पाण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. त्यातच करार संपल्याने पाटबंधारे विभागाने पाणी पुरवठ्याबाबत काही निर्णय घेतल्यास पाणीकपात वाढवावी लागणार आहे. त्यामुळे शासन काय भूमिका घेणार, यावर पाण्याची स्थिती अबलंबून असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.