सेट परीक्षा पुन्हा लांबणीवर

ऑनलाइन परीक्षेचा निर्णय अंधातरीत ; डिसेंबरमध्ये होण्याची चिन्हे

 

पुणे – सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात “सेट’ आता डिसेंबरमध्ये होण्याची चिन्हे आहेत. सध्या करोना प्रादुर्भाव, अंतिम वर्षाची परीक्षा ऑक्‍टोबरमध्ये आणि नवीन शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे सेट परीक्षा डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यात सेट परीक्षा घेतली जाते. ती नियोजित वेळापत्रकानुसार 28 जून रोजी होणार होती. त्यासाठी जवळपास सव्वालाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले. मात्र, करोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलली. अद्यापपर्यंत सेट परीक्षेची तारीख निश्‍चित करण्यात आली नाही. त्यामुळे सेट परीक्षा कधी होणार, अशी विचारणा विद्यार्थ्यांकडून होत आहे.

राज्यात करोना संसर्गाचे संकट कायम आहे. त्यातच सर्व विद्यापीठे अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या तयारीत आहेत. त्याची परीक्षा ऑक्‍टोबर महिन्यात होत आहेत. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने 1 नोव्हेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यातच ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये यूपीएससीच्या परीक्षा होणार आहेत.

त्यामुळे सेट परीक्षेच्या केंद्रासाठी महाविद्यालये डिसेंबर महिन्यात उपलब्ध होतील. त्यामुळे सेट परीक्षा डिसेंबर अखेरपर्यंत घेण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सेट परीक्षेसाठी अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी मिळण्याची शक्‍यता कमी असल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.