सेट परीक्षाही आता ऑनलाइन!

विद्यापीठ प्रयत्नशील : प्रक्रियेला मिळाली गती

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोव्यात घेतली जाणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेटची यापुढची परीक्षा नेट परीक्षेच्या धर्तीवर ऑनलाइन घेण्यात येणार आहे. त्याबाबतची तयारी विद्यापीठाने सुरू केली आहे. “सेट’च्या ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यापीठ प्रयत्नशील असून, या प्रक्रियेला आता गती मिळाली असल्याचे दिसून येत आहे.

विद्यापीठाने शुक्रवारी “सेट’ परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यानंतर आता सेटची परीक्षाही ऑनलाइनद्वारे होणार असल्याच्या वृत्तास दुजोरा मिळत आहे. गेल्या वर्षभरापासून विद्यापीठाकडून सेट परीक्षा महाराष्ट्र व गोवा राज्यात ऑनलाइनद्वारे घेण्यासाठी बैठका झाल्या. त्याबाबत चाचपणी घेण्यात येत आहे. मात्र, सेटची ऑनलाइन परीक्षा कधी होणार, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेटची परीक्षा ऑनलाइनद्वारे घेण्यात येत आहे. त्याप्रमाणे सेटची परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. सध्या सेटची परीक्षा ऑफलाइनद्वारे होत आहे. एकाचवेळी महाराष्ट्र व गोवा राज्यांत परीक्षा घेणे, परीक्षेसाठी प्रश्‍नपत्रिका व उत्तरपत्रिका उपलब्ध करणे, परीक्षेसंबंधी स्टेशनरी इत्यादी साहित्य पाठविणे हे मोठे आव्हान असते. त्यात कागद, वेळ आणि आर्थिक खर्चाचा भार पडतो. विद्यार्थ्यांना सहजपणे परीक्षा देण्यासाठी ऑनलाइनही पद्धत योग्य आहे. त्यामुळे परीक्षेतही पारदर्शकता येण्यासाठी सेट परीक्षा ऑनलाइनद्वारे होण्यासाठी विद्यापीठाने पाऊल उचलले आहे.

सेटच्या ऑनलाइनमध्ये परीक्षा पद्धतीत कोणतेही बदल केला जाणार नाही. पेपर 1 हा 100 गुणांचा, तर पेपर क्रमांक 2 हा दोनशे गुणांचा राहील. मात्र, ऑनलाइन परीक्षेत एकाचवेळी परीक्षा घेता येणे शक्‍य नाही. त्यासाठी ठराविक कालावधीत सर्व उमेदवारांना परीक्षा घेण्यासाठी त्याबाबतची संगणक व यंत्रणा निर्माण करावी लागणार आहे. ऑनलाइन परीक्षेसाठी त्याप्रमाणात प्रश्‍नसंचही उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. त्यावर सध्या विद्यापीठाकडून काम सुरू आहे.

नेटच्या धर्तीवर आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार विद्यापीठाचे सेट परीक्षाही ऑनलाइन घेण्याचा निर्णय संबंधित परीक्षेच्या नियामक मंडळाकडून घेतले जाईल. सेटची परीक्षा ऑनलाइनद्वारे घेण्यास विद्यापीठ प्रयत्नशील आहे.
– डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.