खासगी 40 डॉक्‍टर्सही देणार सेवा

ससून हॉस्पिटलमध्ये कार्यरत राहणार : जिल्हाधिकारी

पुणे – करोना विषाणूचे संशंयित रुग्ण पुणे शहरातही आढळून आल्याचे निदर्शनास आलेले आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्‍यता लक्षात घेता, त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तत्काळ उपाययोजना आखणे आवश्‍यक आहे. त्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. त्यानुसार शहरातील विविध हॉस्पिटलमधील 40 डॉक्‍टर यांच्या सेवा अधिगृहित केल्या आहे, आता हे डॉक्‍टर ससून हॉस्पिटलमध्ये कार्यरत राहणार आहेत.

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी हे या प्राधिकारणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कोव्हिड-19 साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी डॉक्‍टरांची सेवा अधिष्ठाता शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्याकडे अधिग्रहीत केल्या आहेत.

तथापि अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांनी आवश्‍यकतेनुसार अधिग्रहीत केलेल्या वैद्यकीय अधिकारी यांची सेवा उपलब्ध करुन घ्यावी, सदर नियुक्ती केलेल्या वैद्यकीय अधिकारी यांचे योग्य ते मानधन अदा करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

दोघांवर समन्वयाची जबाबदारी
कोव्हिड – 19 साथीच्या रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झालेली असून ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये रुग्ण उपचारासाठी भरती होत आहेत. या रुग्णांना उत्कृष्ट उपचार होण्याच्या दृष्टीने व रुग्णसंख्या वाढल्यास अतिदक्षता कक्षामध्ये तज्ज्ञ डॉक्‍टरांची कमतरता भासू नये यासाठी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांनी बै.जी.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बधिरीकरणशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख व प्राध्यापक डॉ. संयोगिता नाईक, राजेंद्र गोळे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.