सेवा केंद्रातील रकमेचा होतोय ‘गोलमाल’

पालिकेच्या उत्पन्नावर कर्मचारीच डल्ला मारत असल्याच्या तक्रारी

पुणे – क्षेत्रीय कार्यालये तसेच शहरात वेगवेगळ्या सेवा केंद्रांच्या माध्यमातून महापालिकेस मिळणाऱ्या उत्पन्नाच्या रकमेवर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच डल्ला मारण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सेवा केंद्रात जमा होणाऱ्या सर्व रकमेच्या हिशेबाची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर देण्यात आली असून या रकमेची दैनंदिन माहिती ठेवण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

सेवा केंद्रांमध्ये जमा झालेल्या रकमेच्या नोंदी नियमित न ठेवता लाखो रुपयांचा अपहार झाल्याचे प्रकार समोर आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर, जन्ममृत्यू नोंदणी दाखले, विवाह नोंदणी, कर भरणा, दंडाची रक्कम स्वीकारणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. याशिवाय, अनेक उद्यानांमध्ये नागरिकांकडून प्रवेशासाठी शुल्कही आकारले जाते. हे शुल्क दररोज नियमित नोंदी ठेऊन दुसऱ्या दिवशी संबंधित बॅंक खात्यात जमा करणे आवश्‍यक असते. तसेच त्याचे हिशेबही ठेवणे आवश्‍यक असते. मात्र, क्षेत्रीय कार्यालय प्रमुखांकडून या कामासाठी एखाद्या कर्मचाऱ्याची नेमणूक केल्यानंतर पुन्हा या हिशेब वह्या तसेच रकमेच्या नोंदी तपासल्याच जात नाहीत. त्यामुळे नेमके किती दाखले गेले, किती सेवांसाठी किती रक्कम वसूल झाली, याची कोणतीही माहिती क्षेत्रीय अधिकारी ठेवत नाहीत. त्यामुळे या माध्यमातून लाखो रुपयांचा अपहार होत असल्याची दाट शक्‍यता आहे.

काही दिवसांपूर्वीच उद्यान विभागाच्या एका कर्मचाऱ्याकडून उद्यानांच्या प्रवेश शुल्कापोटी जमा झालेली तब्बल दीड लाख रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे असे प्रकार वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन कार्यालयीन आदेश काढून या रकमांची तपासणी तसेच या पुढचे हिशेब ठेवण्याचे आदेश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आता यावर काय कार्यवाही होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here