मुंबई – बॉलीवूडची अभिनेत्री अनन्या पांडेची दुसऱ्या दिवशीही एनसीबीने चौकशी केली. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानबरोबर तिचे व्हॉट्सऍप चॅट एनसीबीला आढळून आल्याने त्या अनुषंगाने तिचा जबाब नोंदवून घेण्यासाठी एनसीबीने तिला बोलावून घेतले होते.
काल (दि. २२) तिची दक्षिण मुंबईतील एनसीबीच्या कार्यालयात बोलावून घेऊन चौकशी करण्यात आली होती. अनन्या ही अभिनेते चंकी पांडे यांची कन्या आहे. ते स्वत: तिला एनसीबीच्या कार्यालयात घेऊन आले होते.
यासोबतच शुक्रवारी एनसीबीच्या रडारवर एका ‘सुप्रसिद्ध व्यक्ती’चा २४ वर्षीय नोकरही आल्याची माहिती समोर आली आहे. या ‘ड्रग पॅडलर नोकर’ला एनसीबी अधिकाऱ्यांनी मुंबईच्या मालाड भागातून ताब्यात घेतले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीबीने शुक्रवारी नोकराची चौकशी केल्याचे समोर आले आहे. आणि सोमवारी पुन्हा त्याला चौकशीसाठी बोलावले आहे. याच २४ वर्षीय नोकराने ‘अनन्याच्या सांगण्यावरून आर्यनला ड्रग्स पोहोचवले’ असे म्हटले जात आहे.