लहान मुलांच्या लसीकरणाबाबत महत्त्वाची बातमी; ‘नोवोव्हॅक्‍स’ला क्‍लिनिकल चाचणीस मिळाली परवानगी

नवी दिल्ली – देशभरात 21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्वांसाठी मोफत लसीकरण सुरू होणार आहे. त्याआधीच लहान मुलांच्या लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण वृत्त समोर आले आहे. लहान मुलांना आता सीरमची इन्स्टिट्यूटची नोवोव्हॅक्‍स लसही दिली जाणार आहे. भारतात या लसीच्या क्‍लिनिकल चाचणीला परवानगी देण्यात आली आहे.

सध्या देशात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्‍सिन लशीला लहान मुलांवर चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. आता पुण्याची सीरम इन्स्टिट्यूटही लहान मुलांना करोना लस देण्याच्या तयारीत आहे. नोवोव्हॅक्‍स लसीचे जुलैमध्येच लहान मुलांवर क्‍लिनिकल ट्रायल करण्याचा कंपनीचा विचार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अमेरिकेतील नोवोव्हॅक्‍स कंपनीच्या मदतीने सीरम इन्स्टिट्यूने नोवोव्हॅक्‍स ही लस तयार केलेली आहे. दोन दिवसांपूर्वीच या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम जारी करण्यात आले. नोवोव्हॅक्‍स म्हणजेच NVX-CoV2373 करोना लस. या लसीची 29,960 लोकांवर चाचणी घेण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या लसीचा एकूण प्रभाव 90.4 टक्के आहे, तर मध्यम आणि तीव्र आजारापासून संरक्षण देण्यात ही लस 100 टक्के प्रभावी आहे.

नोवोव्हॅक्‍सने सांगितले की, यूएस आणि मेक्‍सिकोमध्ये या लसीची चाचणी घेण्यात आली आहे. करोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंट्‌सपासून ही लस सुरक्षा देते. सर्वात जास्त प्रभावी आहे. प्राथमिक अहवालानुसार ही लस सुरक्षित आहे आणि जवळपास 90% प्रभावी आहे.
या लसीचा साठा आणि वाहतूकही सोपी आहे. जगभरात ही लस खूप फायदेशीर ठरणार आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत यूएस, युरोप आणि जगभरातील इतर देशांकडून कंपनी आपल्या लसीसाठी परवानगी मागणार आहे. त्यानंतर महिन्याला या लसीचे 100 दशलक्ष डोस उत्पादित केले जाणार आहेत.

आपल्या लसीचे बहुतेक डोस मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये जातील, असे नोवोव्हॅक्‍सचे चीफ एक्‍झिक्‍युटिव्ह स्टॅनले इरेक यांनी असोसिएट प्रेसशी बोलताना सांगितले. दरम्यान, भारत या वर्षाच्या अखेरपर्यंत या लसीचे 20 कोटी डोस आणण्याच्या तयारीत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.