‘सीरम’ची इंग्लंडमध्ये 24 अब्ज रुपयांची मोठी गुंतवणूक

लंडन – आपल्या लसीचा व्यवसाय वाढवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वतीने इंग्लंडमध्ये 24 कोटी पाऊंडस्‌ची अर्थात 24 अब्ज रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. भारत इंग्लंडमधील व्यापारवृध्दी अंतर्गत ही गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे इंग्लंडमध्ये साडेसहा हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, असे जाहीर करण्यात आले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यात होणाऱ्या चर्चेआधी ही घोषणा करण्यात आली. हेल्थकेअर, बायोटेक आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील 20 भारतीय कंपन्यांनी या आठवड्यात इंग्लंडमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे. पुण्यात मुख्य कार्यालय असणाऱ्या सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे अदर पुनावाला त्यातील एक आहेत.

इंग्लंडमध्ये नव्याने सुरू केलेल्या विक्री कार्यालयाद्वारे एक अब्ज अमेरिकन डॉलर्सचा नवा व्यवसाय सीरमला मिळेल. त्याची गुंतवणूकही इंग्लंडमध्येच करण्यात येईल, असे निवेदन पंतप्रधान कार्यालयाने कंपनीच्या इंग्लंडमधील बाजारपेठेच्या संदर्भातील योजनेच्या अनुषंगाने केले आहे.

सीरमच्या गुंतवणुकीने मानवी चाचण्या, संसोधन आणि विकास तसेच लस उत्पादनाला पाठींबा मिळणार आहे. त्यामुळे करोनाला पराभूत करण्यासाठी त्याचा फायदा इंग्लंड आणि साऱ्या जगाला होणार आहे. कोडॅजेनिक्‍सच्या सहकार्याने नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या लसीच्या मानवी चाचणीस सीरमने इंग्लंडमध्ये सुरवात केली आहे, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या लंडनमध्ये असणाऱ्या पूनावाला यांनी भारताबाहेर लस उत्पादन वाढवण्याचे अलीकडेच संकेत दिले होते. त्यांनी लंडनमध्ये झालेल्या चर्चेचे वर्णन उत्तम असे केले होते. आम्ही आणखी कठोर परिश्रम करू आणि भारताचा करोनाविरूध्दचा लढा मजबूत करू, असे ट्‌विटही पुनावाला यांनी केले आहे.

ग्लोबल जेन कॉर्प यांनी येत्या पाच वर्षात 5कोटी 90 लाख पाउंडची गुंतवणूक इंग्लंडमध्ये करण्यास अनुकुलता दर्शवलीआहे. त्यांचा तेथे संशोधन आणि विकास विभाग विकसित करणार असून केंब्रीजच्या जनुकीय संरचना विभागात तो उभारण्यात येणार आहे.

भारतातील प्रख्यात कंपन्या इंग्लंडमध्ये गुंतवणूक करत आहेत त्यांच्यासोबत ग्लोबल जेन कॉर्पने हातात हात मिळवल्याने मला आनंद होत आहे. त्यामुळे आमच्या आरोग्य क्षेत्राला चालना मिळून आर्थिक वाढीला हातभार लागेल.
बोरीस जॉन्सन, पंतप्रधान इंग्लंड

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.