नवी दिल्ली – जगभरात थैमान घालणाऱ्या करोना लसीच्या चाचण्या अनेक देशांमध्ये सुरू आहेत. तर काही देशांमध्ये चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. भारतात मात्र करोना लस वितरित करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टीट्युटला केंद्र सरकारकडून पहिली पर्चेस ऑर्डर अर्थात खरेदी आदेश देण्यात आला आहे.
सरकारने कोव्हिशिल्ड आणि स्वदेशी कोव्हॅक्सिन या दोन करोना प्रतिबंधक लसींना आपत्कालीन मर्यादीत वापर करण्यास मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने देशात येत्या 16 जानेवारीपासून करोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात होणार असल्याचे आधीच सांगितले आहे.
Serum Institute of India (SII) has received purchase order from Government of India: SII officials #COVID19Vaccine pic.twitter.com/pnZtlWuCSm
— ANI (@ANI) January 11, 2021
लसीकरणात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि करोना योद्धयांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांच्या लसीकरणाची योजना आहे. त्यानंतर 50 वर्षांवरील व्यक्ती आणि को-मोर्बिडीटी असणारे 50 पेक्षा कमी वयाच्या लोकांना लसीचे डोस दिले जातील. या पार्श्वभूमीवर सरकारने सीरमला पर्चस ऑर्डर दिली आहे.
दरम्यान सीरमची करोना लस 200 रुपये प्रती डोस दराने देण्यात येणार असल्याचे सीरमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जगभरात कोरोना संसर्गामुळे मोठ्या प्रमाणात हाणी झाली आहे. आता लस उपलब्ध झाल्याने सर्वांना दिलासा मिळणार आहे.