सिरम इन्स्टिट्यूट अग्नितांडव : दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश – अजित पवार

पुणे – पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझविण्याच्या मदत कार्यात सहभागी झाल्या आहेत. पुणे आयुक्तांकडून मी यासंदर्भातली माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

सदर प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो की, कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत आग विझवणे आणि दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवणे यास सध्या प्राधान्य देण्यात येत आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मांजरी बुद्रुक येथील सिरम इन्स्टिट्युट कंपनीला मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या वतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने दोन तास झाले तरी आग आटोक्यात येत नाही. बीसीजी लस बनवण्याच्या युनिटला आग लागली असून करोना लस सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

‘तुम्ही सर्वांनी केलेल्या प्रार्थनेमुळे या आगीत इमारतीच्या काही मजल्याचे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवीत हानी झाली नाही. तुमच्या सर्वांचे आभार. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत,’ असे  सिरम इन्स्टिट्यूट चे सीईओ आदर पुनावाला यांनी ट्विट करून म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.