पुणे – सीरमला लागलेल्या आगीने एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. रोटाव्हायरस आणि बीसीजीच्या लस उत्पादन आणि साठवणुकीला त्याचा फटका बसला आहे. मात्र, कोविशिल्डच्या उत्पादनावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे आगीनंतर दुसऱ्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी सांगितले.
गुरुवारी आग लागलेली इमारत नवी होती. तेथे अन्य उत्पादनांचे काम सुरू करण्यात येत होते. तेथे कोणताही साठवण अथवा उत्पादन होत नव्हते. ते पूर्णत: नवे युनिट होते. तेथे उपकरणे बसवण्याचे काम सुरू होते. तेच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे सांगून ते म्हणाले, आम्ही जे गमावले ते भविष्यातील नियोजन होते.
पूनावाला यांनी सुरुवातीला कोणतीही जीवितहानी नसल्याचे ट्विट केले होते. त्याबाबत खुलासा करताना ते म्हणाले, आम्हाला सुरुवातीला कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्याबाबत माहिती नव्हती. ज्यावेळी आम्हला कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली, ती आम्ही पुढे केली. मात्र धूर गेल्यानंतर आम्हाला मृतदेह आढळले. आमच्याकडे तृतीय पक्षीय कर्मचाऱ्यांची पूर्ण यादी नाही. तेथे सध्या किती जण काम करतात, याचीही आम्हाला माहिती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दोन तासांत आटोक्यात
ही आग पावणेदोन ते सव्वादोनच्या सुमारास लागली. साडेचारच्या सुमारास ती आटोक्यात आणली. अग्निशमन दलाचे दहा बंब यासाठी कार्यरत होते. त्याशिवाय चार टॅंकर आणि अन्य सामग्री तैनात करण्यात आली होती.