पुणे : मागील काही दिवसांपासून सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला हे भारतात असुरक्षित वाटत असल्याने लंडनला गेले होते. मात्र आज अखेर पुनावाला हे भारतात परतले आहेत. पुण्यामध्ये खासगी विमानाने अदर पूनावाला दाखल झाले.
जवळपास गेल्या महिन्याभरापासून जास्त काळ परदेशात असणाऱ्या अदर पूनावाला यांनी सतत धमक्या मिळत असल्याचा आरोप केल्याने संपूर्ण देशात एकच खळबळउडाली होती. यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान आता ते पुण्यात परतले असून हे प्रकरण पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भारतात एकीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु असताना दुसरीकडे सिरमच्या कोव्हिशिल्ड लसीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. देशात करोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने गोंधळाचे वातावरण असताना यादरम्यानच मे महिन्यात अदर पूनावाला लंडनला निघून गेले होते. अदर पूनावाला यांनी आपण उद्योगाच्या निमित्ताने लंडनला जात असून तेथील काम संपल्यानंतर परतणार असल्याचे सांगितले होते. सिरम लंडनमध्येही आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे.
Had an excellent meeting with all our partners & stakeholders in the U.K. Meanwhile, pleased to state that COVISHIELD’s production is in full swing in Pune. I look forward to reviewing operations upon my return in a few days.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) May 1, 2021
सिरम फक्त भारतच नाही तर जगभरातील सर्वात मोठ्या लसनिर्मिती कंपन्यांमध्ये गणली जाते. सिरम कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन करत असून आतापर्यंत सर्वाधिक वापर झालेल्या लसींमध्ये तिचा समावेश आहे. ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान सिरम केंद्र सरकारला जवळपास ५० कोटी लसींचे डोस पुरवणार आहे.
अदर पूनावाला यांनी नुकतेच ट्विट करत ब्रिटनमध्ये भागीदार आणि भागधारकांसोबत चांगली बैठक झाल्याचं सांगितले होते. तसेच पुण्यात कोव्हिशिल्डचे उत्पादन वेगाने सुरु असल्याची माहिती दिली होती. काही दिवसांत मी परतणार असून यावेळी कामाची पाहणी करण्यास उत्सुक आहे असेही ते म्हणाले होते.