उरुळी कांचन -पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरात मागील चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच मागील दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढू लागला आहे. त्यातच बुधवारी (दि. 1) दिवसभर रिमझिम पाऊस तर दुसरीकडे थंडीची चाहूल सुरू झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे साथींच्या आजाराची भिती निर्माण झाली आहे.
ढगाळ वातावरण अधून-मधून होणारा पाऊस आणि रात्री थंडी अशा विचित्र हवामानामुळे पूर्व हवेलीत सध्या सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले आहेत. दिवसभर थंड हवा, मधेच पडणारा पाऊस यामुळे सर्दी, ताप व डोकेदुखी शिवाय श्वसनाचा होणारा त्रास असे रुग्ण आढळून येत आहेत. सततच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम मात्र मानवी आरोग्यावर दिसू लागला आहे.
उरुळी कांचनसह परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सध्या सुरू असणाऱ्या वातावरणाचा विचार करता अनेक ऋतुंतील बदलत्या वातावरणाची अनुभूती अनुभवायला मिळत आहे. निसर्गाचे ऋतुचक्र बदललेले आहे. यामुळे नेमका ऋतू कोणता असाच भास होत आहे. त्यातच मंगळवारी दिवसभर रिमझिम पाऊस यामुळे वातावरणात बदल झाल्याने अनेकांना आजारांना सामोरे जावे लागत आहे.
सध्या बदलत्या हवामानाचा मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. संसर्गजन्य विषाणूंचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे डेंग्यू, चिकुनगुनिया यांचे रुग्ण वाढण्याची शक्यता असते. या वातावरणामुळे सर्दी, डोकेदुखी, ताप यांनी डोकेवर काढले आहे. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे, उकळलेले पाणी प्यावे. अशा समस्या जाणवल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.
– डॉ. समीर ननावरे, श्री चिंतामणी हॉस्पिटल, उरुळी कांचन