मिलान – इटलीतील सीरिज “ए’ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्याच्या इंटर मिलानच्या आशा कायम राहिल्या आहेत. या लढतीत इंटरने एसपीएएल संघाचा 4-0 असा दणदणीत पराभव करत 71 गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. या तालिकेत युवेंट्सचा संघ 77 गुणांसह आघाडीवर आहे. आता जर पुढील साखळी सामन्यांत इंटरने विजय मिळवले व युवेंट्सला पराभवाचा सामना करावा लागला तर इंटरला विजेतेपद मिळविण्याच्या आशा आहेत.
इंटरने एसपीएएलचा 4-0 असा मोठा पराभव केल्याने त्यांच्या गुणांत बोनस गुणांसह वाढ झाली. या सामन्यात आन्टोनियो कॅनदेरव्हाने 37 व्या, ख्रिस्तियानो बीराघीने 55 व्या, अलेक्सिस सॅंचेझने 60 व्या तर, रॉबर्टो गॅग्लियरडीनीने 73 व्या मिनिटाला गोल करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
या स्पर्धेतील सर्व संघांसाठी 5 लढती बाकी आहेत. त्यातील किमान 3 लढती इंटरने जिंकल्या व युवेंट्सला 2 सामने गमवावे लागले तर इंटरचे विजेतेपद निश्चित होणार आहे. या सामन्यात इंटरने 4 गोल नोंदवले असले तरीही ऍलेक्सिस सॅंचेझने केलेला गोल सर्वात प्रेक्षणीय होता.