प्लॅस्टिकपासून इंधन निर्मितीसाठी सप्टेंबरचा मुहूर्त

पुणे – प्लॅस्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मितीचा महापालिकेचा नियोजित प्रकल्प येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. “सीएसआर’च्या माध्यमातून हा प्रकल्प घोले रस्ता येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात उभारण्यात आला आहे.

शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण 10 ते 15 टक्‍के आहे. विघटन होत नसल्याने हे प्लॅस्टिक पर्यावरणाला घातक ठरत आहे. या पार्श्‍वभूमीवर पालिकेने या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षभरापासून घोले रस्ता येथील कचरा रॅम्पच्या भागात यासंबंधात प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात आला. तो यशस्वी ठरल्यानंतर “सीएसआर’च्या माध्यमातून प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. या प्रकल्पाची यंत्र सामग्री बसविण्याचे काम सुरू आहे.

प्युअर ओ फ्युअल प्रा. लि. ही कंपनीतर्फे हा प्रकल्प उभारला जात आहे. सुमारे 4 कोटी 15 लाख रुपये यामध्ये गुंतवणूक केली आहे. प्रकल्पासाठी भारतीय तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. “पायिरोलसिस विथ कॅटलिस्ट’ असे या प्रक्रियेचे नाव आहे. यामध्ये प्लॅस्टीकचे तुकडे करून ऑक्‍सिजन विरहीत तापमानात ते जाळले जाते. यातून गॅस, कार्बन आणि डीझेलची निर्मिती केली जाते. ही प्रक्रिया पर्यावरण पूरक असून मळी किंवा घाण यातून निर्माण होणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

किती असेल क्षमता
प्रकल्पाची क्षमता प्रति दिन चार टन प्लॅस्टिकवर प्रक्रिया करण्याची आहे. यातून प्रति दिन 1500 लिटर डिझेल, 600 किलो गॅस, 350 किलो कार्बन तयार होईल. निर्माण होणारा गॅस हा प्रकल्पासाठीच वापरला जाणार आहे. कार्बन हा औद्योगिक वापरासाठी आणि डिझेल हे भट्ट्यांसाठी पर्यायी इंधन म्हणून दिले जाणार आहे.

कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रक्रियेचे पेटंट आम्ही मिळविले आहे. भारतीय बनावटीचे तंत्रज्ञान असलेला हा पहिलाच प्रकल्प असून सीएसआरच्या माध्यमातून तो चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. महापालिकेकडून आम्हाला जागा आणि पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. उर्वरीत खर्च हा कर्ज काढून प्रकल्प उभा केला आहे.
– मिलिंद देशपांडे, संचालक, प्युअर ओ फ्युअल प्रा. लि.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)