पिंपरी – मागील दोन दिवसांत शहरातील वातावरणात कमालीचा बदल झाला असून, अचानकपणे शहरातील कमाल तापमानामध्ये वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे, ऐन पावसाळ्यात कमाल तापनामाचा पारा 31 अंशाच्या आसपास गेला आहे. त्यामुळे, पिंपरी-चिंचवडकर घामाघूम झाले आहेत. सप्टेंबरमध्येच “ऑक्टोबर हीट’चा अनुभव नागरिकांना येत आहे.
मागील काही दिवसांपासून शहरातील तपामानामध्ये चढ-उतार पहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच शहरातील काही भागात पावसाच्या सरीही कोसळल्या होत्या. मात्र, या पावसानंतर पुन्हा वातावरणामध्ये बदल झाला आहे. शनिवारपासून शहरात ऊन तापायला सुरुवात झाली आहे. रविवारी शहरातील कमाल तापमान 30 अंशांच्या घरात होते. तर सोमवारी यामध्ये पुन्हा वाढ होऊन कमाल तापमानाचा पारा 31 अंशांच्या घरात पोहचला. त्यामुळे, नागरिकांना सोमवारी उन्हाची अधिकच तीव्रता जाणवत होती.
सध्या भाद्रपद हा मराठी महिना सुरु आहे. भाद्रपद महिन्यात उन्हाची तीव्रता अधिकच वाढत असते. मात्र, सध्या उन्हाची तीव्रता अधिक असल्याने नागरिक बेजार झाले आहेत. एकीकडे तापमान वाढत असतानाच अधून-मधून येणाऱ्या ढगांमुळे उकाडा अधिकच जाणवत आहे.