पुणे – महापालिकेकडे सध्या 10 हजार नागरिकांना क्वारंटाइन करण्याची सुविधा उपलब्ध आहे. बाधितांच्या संपर्कात येणाऱ्यांना तेथे ठेवण्यात येणार आहे. मात्र, त्यांचा दैनंदिन खर्च मोठा असून, महापालिकेने केलेली तरतूद अपुरी पडत आहे. त्यासाठी किमान 24 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याने ती तरतूद तातडीने करावी लागणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
शहरातील करोनाबाधितांची संख्या सध्या पाच हजारांच्या पुढे पोहोचली आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेने शहराच्या वेगवेगळ्या भागांत सुविधा निर्माण केल्या आहेत.
सद्य:स्थितीत म्हणजे 23 मेपर्यंत या सर्व केंद्रांमध्ये मिळून 4,572 व्यक्ती आहेत. हॉटेलमध्ये क्वारंटाइन केलेल्यांना वगळता उर्वरित सर्वांचा खर्च महापालिकेला करावा लागत आहे. सर्वांचा चहा-नाश्ता आणि दोनवेळच्या जेवणाचा खर्च महापालिकेतर्फे उचलण्यात येत आहे.