नवी दिल्ली – पंजाबातील पंजाब एकता पार्टी हा पक्ष आज कॉंग्रेसमध्ये विलीन झाला आहे. या पक्षाचे पंजाब विधानसभेत तीन आमदार आहेत. या पक्षाचे नेते सुखपालसिंग खैरा यांनी काल दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर या विलीनीकरणाची घोषणा केली.
हा पक्ष आम आदमी बंडखोरांचा पक्ष मानला जातो. खैरा हे आम आदमी पक्षाचे नेते या नात्याने काही काळ पंजाब विधानसभेतील विरोधी पक्ष नेते होते. त्यांनी म्हटले आहे की, आम आदमी पक्षाबरोबर काम करण्याचा आम्ही निर्णय घेऊन चूक केली आहे.
आम आदमी पक्ष हा वन मॅन शो आहे. खैरा हे स्वता पंजाबातील आमदार आहेत. त्यांच्या समवेत आमदार जगदेवसिंग कमालू, आमदार परिमलसिंग खालसा या आमदारांनीही कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. विलीनीकरणाच्या घोषणेनंतर पत्रकारांशी बोलताना खैरा म्हणाले की आम आदमी पक्षात केजरीवारांखेरीज काहीही नाही.
या पक्षात अंतर्गत लोकशाही नाही आणि संवादही नाही. त्यामुळे आम्ही राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून आमच्या मूळ पक्षात परत जात आहोत असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की आम आदमी पक्षाला अनिवासी भारतीयांनी मोठी मदत गेल्या निवडणुकीत केली होती. त्यांनी पैसाही मोठ्या प्रमाणात पाठवला होता पण हा पैसा लोकांपर्यंत पोहचलाच नाही असा आरोपही त्यांनी केला.